वेंगुर्ला : तालुक्यातील कोचरे येथील सुमारे ६५ वर्षे जुनी कोचरे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये ३ लाख ७७ हजार २६४ रुपयांचा निव्वळ नफा मिळवला आहे. या नफ्यातून सभासदांना ५ टक्के लाभांश देण्याचा निर्णय घेण्यात आला. बुधवार, दि. ३० सप्टेंबर रोजी ग्रामसेवा मंदिर येथे झालेल्या संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेण्यात आला.
या सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन तथा पंचायत समिती सदस्य विष्णू फणसेकर होते. आर्थिक वर्षात सभासद व्याज, बँक डिव्हिडंड, व्यवसाय नफा आदी माध्यमातून संस्थेला सुमारे १४ लाख ३६ हजार ९२३ रुपयांचे उत्पन्न मिळाले.
संस्थेचे कार्यक्षेत्र कोचरे, मायने, मेढा, निवती, श्रीरामवाडी व शेळपी या गावांमध्ये आहे. सभासद व ग्राहकांच्या सक्रिय सहकार्यामुळे संस्थेला सलग दुसऱ्या वर्षी नफा मिळवता आला आहे. संस्थेची उलाढाल व नफा वाढविण्यासाठी संचालक मंडळाकडून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
संस्थेच्या माध्यमातून खत, ऑईल व धान्य विक्रीचा व्यवसाय केला जातो. यावर्षी खत व ऑईल विक्रीतून १ लाख २१ हजार ८०३ रुपये, तर धान्य विभागातून ३ लाख ६४ हजार ११८ रुपयांचे उत्पन्न मिळाले. तसेच सभासद व ग्रामस्थांच्या सोयीसाठी संस्थेने सीएससी सेंटर सुरू केले असून शासकीय कामांसाठी आवश्यक कागदपत्रे, मोबाईल रिचार्ज, टीव्ही रिचार्ज, ई-केवायसी आदी विविध सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने तोट्यात असलेल्या संस्थेला सलग दोन वर्षे नफ्यात आणण्यासाठी संचालक मंडळ व कर्मचाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नांचे सभासदांनी कौतुक केले. यावेळी अल्प मोबदल्यात सभासदांच्या हितासाठी कार्यरत असलेले सचिव राकेश राणे, सहसचिव शामल मांजरेकर, किसन हंजनकर व अविनाश रावले यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
संस्थेच्या आर्थिक प्रगतीसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांचे सभासदांनी स्वागत केले असून, भविष्यातही संस्थेची आर्थिक स्थिती अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
--
Post a Comment