आदिवासी समाजातील मयुरी वाघे यांची सुरक्षित प्रसूती; माता व बाळाची प्रकृती स्थिर
खेड: आंबये नवानगर येथील आदिवासी समाजातील मयुरी महेश वाघे (वय २२) यांची प्राथमिक आरोग्य केंद्र, जामगे येथे दुसरी प्रसूती यशस्वीपणे करण्यात आली. ग्रामीण व दुर्गम भागातील महिलांना स्थानिक पातळीवर सुरक्षित आणि वेळेवर प्रसूतीची सुविधा मिळत असल्याने परिसरातील नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
प्रसूतीसाठी मयुरी वाघे यांना प्राथमिक आरोग्य केंद्र, जामगे येथे दाखल करण्यात आले होते. वैद्यकीय अधिकारी डॉ. नम्रता भुवड व डॉ. आदित्य चिंधे यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय पथकाने आवश्यक उपचार व काळजी घेत त्यांची प्रसूती यशस्वीरीत्या पार पाडली. प्रसूतीनंतर माता व बाळाची प्रकृती स्थिर असून दोघांचीही आवश्यक काळजी घेण्यात आली.
या प्रसूतीदरम्यान शंकर पार्टे, प्रतीक्षा जाधव, परिचारिका शुभांगी हरावडे, आशा सेविका प्राची कदम तसेच वाहनचालक अमित कदम यांनी महत्त्वपूर्ण सहकार्य केले.
प्राथमिक आरोग्य केंद्र जामगे येथील डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी आणि आशा सेविकांच्या तत्पर सेवेमुळे ही दुसरी प्रसूती यशस्वीपणे पार पडली. ग्रामीण तसेच आदिवासी भागातील गर्भवती महिलांना सुरक्षित मातृत्वासाठी आवश्यक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने सातत्याने प्रयत्न केले जात आहेत.
--
Post a Comment