इंजिनिअर अमेय शिंदे यांचा प्रयोगशील शेतीचा प्रेरणादायी प्रवास; शेतीसोबत मत्स्य, खेकडा व कुक्कुटपालन
खेड : प्रतिनिधी
मुंबईतील धकाधकीचे जीवन, चांगली नोकरी आणि शहरातील सुखसोयी सोडून गावाकडे परतणे आणि शेतीत नवनवे प्रयोग करत स्वयंपूर्ण होणे,
इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकम्युनिकेशन इंजिनिअर असलेल्या अमेयने काही काळ विविध उत्पादनांच्या मार्केटिंग क्षेत्रात काम केले. फोटोग्राफीची आवडही त्याला होती. कोविडपूर्व काळात त्याने गावात अवघ्या २० गुंठे जमिनीवर छोटासा प्रकल्प सुरू केला. मात्र, कोरोनाच्या काळात त्याने मुंबई सोडून कायमस्वरूपी गावात राहून शेती करण्याचा निर्णय घेतला. निवृत्त वडील आणि अॅथलिट असलेली आई त्याच्या सोबतीला उभी राहिली.
‘निसर्गात विविध झाडे एकमेकांना पूरक ठरून वाढतात’ या विचारातून अमेयने पावणेचार एकरांत विविध फळझाडे, भविष्यात उत्पन्न देणारी झाडे आणि त्यांच्यामधील जागेत हंगामी पिके अशी मिश्र शेती उभी केली आहे. यासोबतच खेकडा पालनासाठी स्ट्रक्चर, मत्स्यपालनासाठी तीन तलाव आणि कुक्कुटपालनासाठी शेड उभारले आहे.
शेतीमालाला योग्य दर मिळत नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने विक्रीची पद्धतही बदलली. उत्तम काकडीला व्यापाऱ्यांकडून अपेक्षित दर न मिळाल्याने स्वतः खेड बसस्थानकाजवळ रस्त्यावर उभे राहून काकडीची थेट विक्री केली. भाजीपाला व तलावातील मासे पंचक्रोशीत थेट ग्राहकांना विकण्याचा त्याचा प्रयत्न सुरू आहे.
‘गावात शेती करायची असेल तर लाज सोडून विकायला शिकले पाहिजे,’ हा अमेयचा संदेश आहे. शेतकऱ्यांनी स्वतः बाजारपेठेत उतरले पाहिजे, असा त्याचा आग्रह आहे.
अमेयच्या प्रकल्पाला शाळा व विविध संस्थांच्या भेटीही होत आहेत. मात्र, केवळ पाहण्यासाठी येण्यापेक्षा येथे राहून काम शिकावे, अशी त्याची भूमिका आहे. लवकरच येथे अॅग्रो टुरिझम सुरू करण्याचे नियोजनही सुरू आहे.
फोटोग्राफीची आवड जपताना शेतीला व्यवसायाचे रूप देणारा अमेय आज ‘नोकरी सोडून शेती’ या संकल्पनेला नवा अर्थ देत आहे. प्रचंड मेहनत, अभ्यास, प्रयोगशीलता आणि जिद्दीच्या जोरावर तिसंगीत त्याने स्वतःचे ‘नंदनवन’ उभे केले आहे. खऱ्या अर्थाने हा तरुण ‘अद्भुत योद्धा’ ठरला आहे.
--
Post a Comment