मुंबई | निर्झर डिजिटल
महाराष्ट्रातील विविध शासकीय सेवाभरती परीक्षांमध्ये सर्वसमावेशक आणि सुरक्षित सुधारणा करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत राज्यातील विविध सेवाभरती परीक्षांच्या पद्धतीचा आढावा घेण्यात आला. परीक्षांमध्ये पारदर्शकता, सुरक्षितता आणि विश्वासार्हता वाढविण्यासाठी समिती राज्यातील प्रत्येक महसुली विभागात जाऊन विद्यार्थी, शिक्षण संस्थाचालक आणि संबंधित घटकांशी चर्चा करणार आहे.
या चर्चेतून प्राप्त होणाऱ्या सूचनांच्या आधारे राज्यासाठी समग्र भरती परीक्षा धोरण निश्चित करण्यात येणार आहे.
पेपरफुटीविरोधी कायद्याची अंमलबजावणी
केंद्र सरकारने पेपरफुटी आणि परीक्षा गैरव्यवहार रोखण्यासाठी कठोर कायदा केला आहे. महाराष्ट्रातही यासंदर्भात स्वतंत्र कायदा अस्तित्वात आहे. मात्र, केंद्राचा कायदा अधिक कठोर असल्याने तो महाराष्ट्रात लागू करण्यासंदर्भातील प्रक्रिया येत्या पंधरवड्यात पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
२५ हजार सुरक्षित क्लासरूम उभारणार
परीक्षा प्रक्रियेत सुरक्षितता वाढविण्यासाठी राज्यात किमान २५ हजार सुरक्षित क्लासरूम उभारण्याचे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. या सुविधांमुळे विविध भरती परीक्षा अधिक सुरक्षित आणि पारदर्शक पद्धतीने घेण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे.
बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्यातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
--
Post a Comment