खेड | प्रतिनिधी
तालुक्यातील घोगरे गावचे सुपुत्र तथा सामाजिक, धार्मिक आणि राजकीय क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून सक्रिय असलेले बाबाराम पवार यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)च्या खेड तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
सामाजिक संस्थांच्या माध्यमातून समाजसेवेत सक्रिय सहभाग, आंबेडकरी चळवळीतील कार्य, तसेच महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांशी असलेली बांधिलकी यामुळे बाबाराम पवार यांची या पदासाठी निवड करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
संपूर्ण खेड तालुक्यातील दांडगा जनसंपर्क, संघटन कौशल्य आणि राजकीय अनुभवाची दखल घेत त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले) राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली.
खेड तालुक्यात पक्ष संघटना अधिक मजबूत करणे, ग्रामीण भागात पक्षाचा विस्तार करणे तसेच समाजातील वंचित, दुर्बल आणि उपेक्षित घटकांच्या प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडण्यासाठी काम करण्याची जबाबदारी बाबाराम पवार यांच्यावर राहणार आहे.
या नियुक्तीप्रसंगी रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रीतम रुके, कोकण प्रदेश युवक अध्यक्ष सुशांतभाई सकपाळ, जिल्हा संपर्कप्रमुख गौतम तांबे, पर्यावरण जिल्हाध्यक्ष ॲड. सुरेंद्र तांबे, गणेश शिर्के, मिलिंद तांबे, विकास धुत्रे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
बाबाराम पवार यांच्या नियुक्तीबद्दल विविध सामाजिक, राजकीय आणि आंबेडकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांकडून अभिनंदन करण्यात येत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली खेड तालुक्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)ची संघटना अधिक बळकट होऊन पक्षाचा जनाधार वाढेल, असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आला.
--
निर्झर डिजिटल | बातमीतून सत्याकडे
Post a Comment