खेड : शहरातील विविध समस्यांसह खेड रेल्वेस्थानक ते भोस्ते-अलसुरे-कोंडिवली मार्ग शिव-बोरज रस्त्याच्या दुरवस्थेप्रश्नी येथील सामाजिक कार्यकर्ते मंगेश मोरे यांनी १५ ऑगस्ट रोजी उपोषणाचा इशारा दिला आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, खेड रेल्वेस्थानक ते शिव-बोरज रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या मार्गाच्या दुरुस्तीसाठी जिल्हा परिषद सदस्यांसह पंचायत समिती सभापतींनी दुर्लक्ष केले आहे. यामुळे एसटी बसेससह खासगी छोट्या-मोठ्या वाहनांवरील चालकांना मार्गक्रमण करताना जागोजागी पडलेल्या खड्ड्यांतून तारेवरची कसरत करावी लागत आहे. पादचाऱ्यांनादेखील त्रास सहन करावा लागत आहे.
खेड नगरपरिषद हद्दीतील अनेक कामे निकृष्ट दर्जाची झाली आहेत. शिवाईनगर, मराठा भवन परिसर, मरकज मशीद, पाण्याची टाकी परिसरातील रस्ते निकृष्ट दर्जाचे झाले आहेत. कमी सिमेंटचा वापर करून गटारे व मोऱ्यांची कामे करण्यात आल्याने त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.
जलजीवन मिशन योजनेचे पाइप टाकण्यासाठी खोदण्यात आलेल्या रस्त्यांचीही पुन्हा व्यवस्थित डागडुजी करण्यात न आल्याने वाहनचालकांची कसरत सुरू आहे.
नगरपरिषद हद्दीतील विकासकामांचे निविदा फलक व त्यावर एकूण खर्च, काम कोणत्या प्रकारे करण्यात येणार आहे, याबाबतची माहिती नागरिकांना मिळत नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
याप्रश्नी ठोस कार्यवाही न झाल्यास १५ ऑगस्ट रोजी पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण छेडले जाईल, असा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे.
--
Post a Comment