शैक्षणिक व शासकीय सवलतींसाठी विद्यार्थ्यांचे ‘आधार’ अपडेट अनिवार्य

५ आणि १५ वर्षे पूर्ण झालेल्या बालकांचे बायोमेट्रिक अपडेट करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन
रत्नागिरी : केंद्र व राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजना, शैक्षणिक सुविधा तसेच शासकीय सेवांचा लाभ विनाअडथळा मिळण्यासाठी नागरिकांनी आपले आधार कार्ड वेळोवेळी अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे. विशेषतः विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अद्ययावत असणे गरजेचे असून, ५ आणि १५ वर्षे पूर्ण झालेल्या बालकांचे बायोमेट्रिक अपडेट करणे अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी शाळा व महाविद्यालयांमध्ये विशेष आधार शिबिरांचे आयोजन करावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी केले आहे.

लहान मुलांच्या वयानुसार त्यांच्या चेहऱ्याच्या ठेवणीत तसेच बायोमेट्रिक माहितीत बदल होत असतात. त्यामुळे बालकाने ५ वर्षे आणि १५ वर्षे पूर्ण केल्यानंतर आधारमधील बायोमेट्रिक माहिती अपडेट करणे आवश्यक आहे. तसेच आधार कार्डवरील नाव, जन्मतारीख, पत्ता किंवा मोबाईल क्रमांकामध्ये काही चूक अथवा बदल असल्यास आवश्यक कागदपत्रांच्या आधारे त्यामध्ये दुरुस्ती करून घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

शिष्यवृत्ती, अपार आयडी आणि डिबिटी साठी महत्त्वाचे

विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अद्ययावत असल्यास विविध शैक्षणिक व शासकीय प्रक्रियांमध्ये त्यांना मोठी मदत होते. शिष्यवृत्ती, विविध शैक्षणिक योजना तसेच अपार आयडी (APAAR ID) तयार करण्यासाठी अचूक आधार माहिती उपयुक्त ठरते. त्याचप्रमाणे शासकीय योजनांचा निधी थेट बँक खात्यात जमा होण्यासाठी बँक खाते आधारशी योग्यरीत्या जोडलेले असणे आवश्यक आहे.

नीट (NEET), जे ई ई (JEE) यांसारख्या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा तसेच प्रवेश प्रक्रियेदरम्यान ओळख पडताळणी करतानाही आधारमधील अचूक माहिती उपयुक्त ठरते. ऐनवेळी आधारमधील चुकीच्या किंवा अपूर्ण माहितीमुळे होणारा मनस्ताप व संभाव्य शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी विद्यार्थ्यांनी आधार अपडेट करून घेणे गरजेचे आहे.

शाळा-महाविद्यालयांमध्ये विशेष शिबिरे

विद्यार्थ्यांना आधार अपडेट करणे सोयीचे व्हावे यासाठी शाळा व महाविद्यालयांनी जवळच्या अधिकृत आधार केंद्राशी समन्वय साधून विशेष आधार शिबिरांचे आयोजन करावे, अशा सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत.

शिबिरांच्या आयोजनासाठी शाळा व महाविद्यालयांना जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी येथील संपर्क अधिकारी प्रतीक पेठकर यांच्याशी ८३५५८६८०६७ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधता येईल.

पालकांनी तातडीने आधार अपडेट करावे

० ते ५ वर्षे वयोगटातील मुलांची नवीन आधार नोंदणी करून घ्यावी. तसेच ५ आणि १५ वर्षे पूर्ण झालेल्या पाल्यांचे अनिवार्य बायोमेट्रिक अपडेट तातडीने पूर्ण करावे. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनीही जवळच्या अधिकृत आधार केंद्रात जाऊन आधारमधील माहिती अद्ययावत करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
--

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...