नारी शक्ती मंगळागौर सोहळ्यात भाग्यलक्ष्मी मंगळागौर ग्रुप प्रथम


खेड : सामाजिक कार्यकर्त्या श्रेया योगेश कदम यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या शिवसेना खेड तालुका महिला आघाडी आयोजित तालुकास्तरीय ‘नारी शक्ती मंगळागौर सोहळा २०२६’ उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. 
महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, पारंपरिक संस्कृतीचे जतन करणे तसेच महिलांमध्ये एकोपा व आत्मविश्वास वाढविण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत खेड तालुक्यातील विविध महिला मंडळांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला. पारंपरिक मंगळागौर खेळ, फुगड्या, नृत्य तसेच विविध सांस्कृतिक सादरीकरणांनी उपस्थितांची मने जिंकली. महिलांनी पारंपरिक वेशभूषेत सादर केलेल्या विविध कलाविष्कारांना उत्स्फूर्त दाद मिळाली.
यावेळी स्पर्धेतील विजेत्यांची घोषणा करण्यात आली. भाग्यलक्ष्मी मंगळागौर ग्रुप, गुणदे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. विजेत्या संघाला रोख रुपये ३५ हजार व आकर्षक सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. रुक्मिणीदेवी महिला मंडळ, खेड यांनी द्वितीय क्रमांक मिळविला. त्यांना रोख रुपये २५ हजार व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. काळकाई कृपा, भरणे जाधववाडी यांनी तृतीय क्रमांक मिळविला असून त्यांना रोख रुपये १५ हजार व आकर्षक सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

मंगळागौर स्पर्धेचे परीक्षण वर्षा भट-बर्वे (दिवेआगर, श्रीवर्धन) आणि अर्चना जोशी (रत्नागिरी) यांनी केले. पारंपरिकता, सादरीकरण कौशल्य, वेशभूषा आणि एकूण कलाविष्काराच्या आधारे त्यांनी स्पर्धकांचे परीक्षण केले.

कार्यक्रमादरम्यान महिला सक्षमीकरण, सामाजिक सहभाग आणि सांस्कृतिक परंपरा जपण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. विजेत्या संघांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. महिलांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे आणि उत्कृष्ट सादरीकरणामुळे ‘नारी शक्ती मंगळागौर सोहळा २०२६’ हा कार्यक्रम संस्मरणीय ठरला.

यावेळी श्रेया कदम, जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता केंद्रे, पंचायत समिती सभापती डॉ. अफिया पालेकर, जिल्हा परिषद सदस्या रेवती पाटील, जाई आंब्रे यांच्यासह विविध मान्यवर, महिला पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
--

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...