दिशा महाराष्ट्राची आयोजित राज्यस्तरीय सन्मान सोहळ्यात गौरव; खेड तालुक्यासाठी अभिमानाची बाब
खेड : क्रिडा क्षेत्रात गेली दोन दशके सातत्याने उल्लेखनीय कार्य करत विविध स्तरावरील स्पर्धांचे यशस्वी आयोजन, खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देणे तसेच सामाजिक व प्रशासकीय जबाबदाऱ्यांमधून क्रीडाविकासाला चालना देणारे खेडचे उपनगराध्यक्ष सतीश उर्फ पप्पू गणपत चिकणे यांना प्रतिष्ठेचा “राज्यस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा भूषण पुरस्कार २०२६” ने सन्मानित करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त दिशा महाराष्ट्राची या संस्थेच्या वतीने महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा राज्यस्तरीय सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला असून, त्यामध्ये क्रीडा क्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल श्री. चिकणे यांची निवड करण्यात आली होती . हा सन्मान सोहळा दि. २६ एप्रिल रोजी दुपारी १ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉल खेड, रत्नागिरी येथे संपन्न झाला. यावेळी मान्यवर भगवान घाडगे, कालेकर साहेब, आत्माराम चव्हाण सर, दिशा महाराष्ट्र ची संपादक श्री तुषार नेवरेकर , आशुतोष साळुंखे, राऊत सर, समिधा चिकणे व इतर उपस्थीत होते
सतीश उर्फ पप्पू चिकणे यांनी २००५ पासून क्रीडा क्षेत्रात स्पर्धा आयोजनाची भक्कम परंपरा निर्माण केली. त्यांनी २००५ मध्ये जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा, २००७ मध्ये राज्यस्तरीय बॉडीबिल्डिंग स्पर्धा निवड चाचणी, २००९ मध्ये जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा तसेच जिल्हास्तरीय बॉडीबिल्डिंग स्पर्धा यांचे यशस्वी आयोजन केले. या सर्व स्पर्धा गुरुवर्य श्री. ग. रा. चिकणे गुरुजी प्रतिष्ठान, खेड यांच्या माध्यमातून पार पडल्या.
यानंतर २०११ मध्ये तालुकास्तरीय २२ कबड्डी स्पर्धा, २०१२ मध्ये जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धा, २०१३ मध्ये जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धा यांचे आयोजन करून विविध खेळांना चालना दिली. विशेष म्हणजे २०१४ ते २०२६ या सलग कालावधीत दरवर्षी तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धांचे सातत्यपूर्ण आयोजन करून ग्रामीण भागातील असंख्य खेळाडूंना संधी उपलब्ध करून दिली. याशिवाय २०२३ मध्ये राज्यस्तरीय निमंत्रित कबड्डी स्पर्धा आमदार चषक आणि २०२४ मध्ये गुरुवर्य प्रतिष्ठानच्या वतीने राज्यस्तरीय अपंग कबड्डी स्पर्धा आयोजित करून त्यांनी सामाजिक बांधिलकीसोबत क्रीडा क्षेत्रातील सर्वसमावेशकतेचाही आदर्श घालून दिला. केवळ स्पर्धा आयोजनापुरतेच नव्हे तर विविध क्रीडा संघटनांमध्ये त्यांनी महत्त्वाची पदे भूषवली आहेत. त्यामध्ये जय हनुमान क्रीडा मंडळ अध्यक्ष, टायटनचा राजा क्रीडा मंडळ सल्लागार, गुरुवर्य श्री. ग. रा. चिकणे गुरुजी प्रतिष्ठान उपाध्यक्ष, खेड तालुका कबड्डी असोसिएशनचे गेली १५ वर्ष अध्यक्ष, रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे गेली ६ वर्ष उपाध्यक्ष अशी जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे सांभाळली आहे.राजकीय व सामाजिक क्षेत्रातही त्यांनी १५ वर्ष नगरसेवक म्हणून तर ४ महिने उपनगराध्यक्ष म्हणून काम करत क्रीडा सुविधा, मैदान विकास, युवा संघटनांना प्रोत्साहन आणि स्थानिक खेळाडूंना पाठबळ देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. क्रीडा क्षेत्रातील हाच प्रदीर्घ, सातत्यपूर्ण, संघटनात्मक आणि प्रेरणादायी प्रवास लक्षात घेऊन सतीश उर्फ पप्पू चिकणे यांना राज्यस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा भूषण पुरस्कार २०२६ बहाल करण्यात आला असल्याने खेड तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
--
إرسال تعليق