खेड : रत्नागिरी-सातारा जिल्ह्याला जोडणाऱ्या रघुवीर घाटात गुरुवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास कोसळलेली भली मोठी दरड अखेर ४५ तासांच्या अथक परिश्रम घेऊन येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी कंत्राटदाराच्या मदतीने हटवून वाहतूक सुरू केली.
गुरुवारी कोसळलेल्या मोठ्या दरडीमुळे कांदाट खोऱ्यातील सुमारे २२ गावांचा संपर्क खेड तालुक्याशी तुटला होता.
या घटनेची माहिती मिळताच खेडच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने शुक्रवारी सकाळी आपत्कालीन दुरुस्ती पथक पाठवून परिस्थितीचे अवलोकन केले मात्र दरडीतील भलेमोठे दगड हटविण्यासाठी ब्रेकरची आवश्यकता असल्याचे लक्षात घेऊन शनिवार सकाळपासून ब्रेकरच्या सहाय्याने दगड फोडण्याचे काम सुरू करण्यात आले. दरम्यान सकाळी सुरू झालेले काम सायंकाळी ४च्या सुमारास पूर्ण झाले.
दरड हटविण्याच्या कामात मोठमोठे दगड अडथळा ठरत असल्याने ब्रेकरच्या सहाय्याने त्यांचे तुकडे करून रस्ता मोकळा करण्याचे काम हाती घेण्यात आले. घाटातील भौगोलिक परिस्थिती आणि दरडप्रवण भागामुळे यंत्रणेला काळजीपूर्वक काम करावे लागले.
दरम्यान, गुरुवारी खेड आगारातून नियमित सुटलेली खेड-अकल्पे एसटी बस सुमारे ४५ तासांच्या मुक्कामाने अखेर आज सायंकाळी ४ वाजता परतीच्या मुक्कामाला रवाना झाली.
--
إرسال تعليق