प्रवाशांच्या मागणीनुसार फेऱ्या वाढविल्याचा सकारात्मक परिणाम; ३१ ऑगस्टला विक्रमी ४५ कोटींचे उत्पन्न
मुंबई : परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी एसटीच्या उत्पन्नवाढीसाठी घेतलेल्या आढावा बैठका आणि अधिकाऱ्यांना दिलेल्या सूचनांचा सकारात्मक परिणाम दिसून आला आहे. जुलैच्या तुलनेत ऑगस्ट महिन्यात एसटीच्या उत्पन्नात तब्बल ६६ कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
प्रवाशांची प्रत्यक्ष गरज आणि मागणी लक्षात घेऊन बसफेऱ्यांचे नियोजन करण्यावर भर देण्यात आला. ग्रामीण व निमशहरी भागातील नोकरदार, शेतकरी, विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या प्रवासाच्या वेळेनुसार फेऱ्यांमध्ये बदल करण्यात आले. तसेच आठवडी बाजार, यात्रा-जत्रा आणि गर्दीच्या दिवसांत अतिरिक्त फेऱ्या सुरू करण्यात आल्या.
३१ ऑगस्टला विक्रमी ४५ कोटींचे उत्पन्न
रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर ३१ ऑगस्ट रोजी एसटीला एका दिवसात तब्बल ४५ कोटी रुपयांचे तिकीट उत्पन्न मिळाले. एसटीच्या इतिहासातील हे विक्रमी दैनंदिन उत्पन्न ठरले आहे. एसटीला सध्या दररोज सरासरी ३४ ते ३५ कोटी रुपये उत्पन्न मिळते. त्या तुलनेत ३१ ऑगस्टला उत्पन्नात तब्बल १० कोटी रुपयांची वाढ झाली.
ऑगस्ट महिन्यात प्रथमच एसटीने एक हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक मासिक उत्पन्नाचा टप्पा गाठला आहे.
‘जिथे प्रवासी, तिथे एसटीची फेरी’ या भूमिकेतून प्रवाशांची मागणी असलेल्या मार्गांवर फेऱ्या वाढविण्यात आल्या. अनुत्पादक लांब पल्ल्याच्या फेऱ्यांपेक्षा प्रवासी उपलब्ध असलेल्या मार्गांना प्राधान्य देण्यात आल्याने उत्पन्नवाढीस हातभार लागला.
“एसटी ही सर्वसामान्यांची जीवनवाहिनी आहे. प्रवाशांच्या गरजेनुसार सेवा पोहोचली पाहिजे. योग्य वाहतूक नियोजन केल्यास एसटीला किमान तोटा होणार नाही, इतके उत्पन्न दर महिन्याला मिळविणे शक्य आहे,” असा विश्वास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला.
आगामी दोन ते तीन महिन्यांत एसटीचा चालू तोटा भरून काढण्याच्या दिशेने वाटचाल करण्याचा महामंडळाचा प्रयत्न आहे.
--
إرسال تعليق