खेड: मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे येथील जगबुडी नदीच्या पुलावर रविवारी (१२ एप्रिल) सकाळी भयानक अपघात घडला. गोव्याहून मुंबईकडे येणाऱ्या मालवाहू कंटेनरने दुभाजक तोडला आणि दोन पुलांच्या मधोमध अडकून पडला.
या अपघातग्रस्त कंटेनरचा अर्धा भाग सुमारे १०० फूट खोल नदीकडे झुकला असला तरी सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.
आज सकाळी साडेसात वाजता घडलेल्या या अपघातात कंटेनरचा वेग जास्त असल्याने चालकाचा ताबा सुटला. दुभाजक फोडून कंटेनर दोन पुलांमधील जागेत अडकला. नदीत कोसळण्याची शक्यता निर्माण झाल्याने परिसरात भीती पसरली. पोलिस आणि बचाव दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. दोन क्रेनच्या मदतीने कंटेनर बाहेर काढण्यात आला. चालकाला किरकोळ जखम झाल्या असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
अपघातानंतर मुंबई-गोवा दिशेने जाणारी एक लेन दीड तास बंद ठेवण्यात आली. यामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली. विशेष बाब म्हणजे, या आठवड्यात जगबुडी पुलावर हा दुसरा मोठा अपघात आहे. वारंवार अपघात होत असल्याने पुलाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपटले आहे. स्थानिक नागरिकांनी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
Post a Comment