मुंबई | निर्झर डिजिटल
राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) प्रवासाला आता डिजिटल स्वरूप देण्याच्या प्रयत्नांना वेग आला आहे. नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC–स्मार्ट कार्ड) वापरण्याला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत असून, १ सप्टेंबरपासून सकाळच्या प्रवासासाठी NCMC कार्डचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे.
महामंडळाने महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी NCMC कार्डची नोंदणी व वितरण प्रक्रिया १६ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू केली होती. २६ जुलैपर्यंत नोंदणी केलेल्या पात्र प्रवाशांची कार्डे त्यांच्या नोंदणी केलेल्या ठिकाणी वितरणासाठी उपलब्ध होणार आहेत. मिळालेल्या कार्डांवर प्रवाशांनी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून त्याचा एसटी प्रवासात वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, १५ ऑगस्टपासून राज्यभरातील शालेय विद्यार्थ्यांसाठीही NCMC कार्डची नोंदणी सुरू करण्यात येणार आहे. प्रत्येक शाळेत एसटीचा अधिकृत परवानाधारक प्रतिनिधी जाऊन विद्यार्थ्यांची नोंदणी करणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी NCMC कार्डसाठी इतर ठिकाणी स्वतंत्र नोंदणी करू नये, असे एसटी महामंडळाने स्पष्ट केले आहे.
NCMC कार्ड अधिकृत एसटी आगार, बसस्थानक तसेच अधिकृत एजंटकडे उपलब्ध करून देण्यात येणार असून, कार्ड रिचार्जची सुविधाही उपलब्ध आहे.
डिजिटल प्रवासाला चालना
NCMC कार्डमुळे एसटीच्या तिकीट व्यवहारात डिजिटल प्रणालीला चालना मिळणार असून प्रवाशांसाठी अधिक सुलभ आणि आधुनिक प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. राज्यभर मोठ्या संख्येने प्रवाशांनी NCMC कार्डसाठी नोंदणी केली असून हजारो कार्डे कार्यान्वित झाली आहेत.
प्रवाशांनी वेळेत NCMC कार्ड घेऊन एसटीच्या डिजिटल प्रवासासाठी सहकार्य करावे, असे आवाहन महामंडळाने केले आहे.
--
إرسال تعليق