एसटीच्या फेऱ्या अणुस्कुरा मार्गे वळवल्या; प्रवाशांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन
रत्नागिरी | प्रतिनिधी : रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्यांना जोडणाऱ्या महत्त्वाच्या आंबाघाट मार्गावर पुन्हा दरड कोसळल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. दरड कोसळल्यामुळे मार्गावर सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्याने प्रादेशिक परिवहन अधिकारी, रत्नागिरी यांनी पुढील आदेश येईपर्यंत आंबाघाट मार्गावरील सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घातली आहे.
आंबाघाट मार्ग बंद झाल्यामुळे रत्नागिरीहून कोल्हापूर तसेच कोल्हापूरहून रत्नागिरीकडे ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना आता पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे. पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या घटना वारंवार घडत असल्याने प्रशासनाकडून सुरक्षेला प्राधान्य देत हा निर्णय घेण्यात आला आहे.
एसटीच्या फेऱ्या अणुस्कुरा मार्गे
आंबाघाट बंदचा परिणाम एसटी बससेवेवरही झाला आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी रत्नागिरी–कोल्हापूर मार्गावरील एसटीच्या फेऱ्या अणुस्कुरा मार्गे वळविण्यात आल्या आहेत.
एसटी बस आता लांजा–वाटूळ–ओणी–पाचल–अणुस्कुरा–मलकापूर मार्गे कोल्हापूर असा प्रवास करणार आहेत. त्यामुळे प्रवाशांनी आंबाघाट मार्ग बंद असल्याची नोंद घेऊन आपल्या प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन एसटी प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
मार्गाची पाहणी केल्यानंतरच निर्णय
दरड कोसळलेल्या ठिकाणची सद्यस्थिती, रस्त्याची अवस्था आणि वाहनांच्या सुरक्षिततेचा आढावा घेतल्यानंतरच आंबाघाट मार्ग पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
तोपर्यंत नागरिकांनी बंद असलेल्या आंबाघाट मार्गावरून प्रवास करण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
--
निर्झर डिजिटल न्यूज | बातमीतून सत्याकडे
Post a Comment