पालघर : जिल्ह्यातील लाखो प्रवाशांसाठी महत्त्वाच्या विरार–डहाणू रेल्वे मार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला अपेक्षित गती मिळत नसल्याचे माहिती अधिकारातून समोर आले आहे. मंजूर निधीपैकी सुमारे ७५ टक्के निधी खर्च झाला असतानाही प्रकल्पातील अनेक महत्त्वाची कामे अद्याप अपूर्ण आहेत.
चौपदरीकरणासाठी नवीन रेल्वेमार्गावर बांधण्यात येणाऱ्या फलाटांच्या कामाबाबतही माहिती अधिकारात धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. फलाटांचे बांधकाम कधी सुरू झाले आणि ते कधी पूर्ण होणार, याची निश्चित माहिती उपलब्ध नसल्याचे एमआरव्हीसीकडून सांगण्यात आले आहे.
प्रकल्पासाठी मंजूर ३,५७८ कोटी रुपयांपैकी २,६९७.४३ कोटी रुपये खर्च झाले आहेत. मात्र, प्रकल्प पूर्ण होण्याची ठोस अंतिम तारीख अद्याप स्पष्ट नसल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहे.
विरार–डहाणू चौपदरीकरणाचे काम मार्च २०२३ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, मुदत उलटूनही काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे प्रकल्पाच्या नियोजनावर आणि विलंबाच्या कारणांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
प्रवाशांना दिलासा कधी?
चौपदरीकरण पूर्ण झाल्यानंतर रेल्वेसेवा अधिक सक्षम होऊन प्रवाशांना मोठा फायदा होण्याची अपेक्षा आहे. मात्र, सध्या प्रकल्पाची निश्चित पूर्णता तारीख जाहीर नसल्याने प्रवाशांचे लक्ष आता रेल्वे प्रशासनाच्या पुढील भूमिकेकडे लागले आहे.
--
إرسال تعليق