पुणे:प्रसंगवधान आणि तत्पर समन्वयाचे उत्तम उदाहरण सादर करत, मध्य रेल्वेच्या तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांनी रेल्वे सुरक्षा दलाच्या मदतीने पुणे रेल्वे स्थानकावर हरवलेल्या ५ वर्षांच्या मुलाचा शोध घेतला आणि त्याला त्याच्या आईच्या स्वाधीन केले.
ही घटना दिनांक ५ ऑगस्ट २०२६ रोजी दादर - तिरुनेलवेली चालुक्य एक्सप्रेस (गाडी क्रमांक 11021) मध्ये घडली. एस/६ डब्यातून प्रवास करणाऱ्या श्रीमती रेवती यांना गाडी पुणे स्थानकावरून सुटल्यानंतर आपला ५ वर्षांचा मुलगा सोबत नसल्याचे लक्षात आले. तो मुलगा चुकून दुसऱ्या एका प्रवाशासोबत पुणे स्थानकावर गाडीतून खाली उतरला होता. मुलगा हरवल्याचे समजताच त्याच्या आईने डब्यात आरडाओरडा करून मदतीसाठी साद घातली.
परिस्थितीची माहिती मिळताच, कर्तव्यावर असलेल्या श्री. शंभू कुमार यादव, ट्रॅव्हलिंग तिकीट एक्झामिनर यांनी त्या आईला मदत करण्यासाठी त्वरित पुढाकार घेतला. त्यांनी श्री. अरविंद महतो, ट्रेन कंडक्टर यांना सावध केले आणि पुणे येथील मुख्य क्रू कंट्रोलरला माहिती दिली. उत्तम पुढाकार घेत, श्री. शंभू कुमार यांनी पुणे येथील आरपीएफ पथकाशी संपर्क साधला आणि हरवलेल्या मुलाचा फोटो त्यांना पाठवला.
अत्यंत तत्परतेने आणि कार्यक्षमतेने कारवाई करत, पुणे स्थानकावरील आरपीएफ जवानांनी अवघ्या १० मिनिटांत त्या मुलाचा शोध घेतला आणि त्याला सुरक्षित ताब्यात घेतले. आरपीएफ पथकाने मुलाचा फोटो श्री. शंभू कुमार यांना पाठवला, ज्याची त्या आईने त्वरित खात्री केली.
श्रीमती रेवती या सातारा स्थानकावर उतरून पुन्हा पुणे येथे परत येऊन मुलाला ताब्यात घेतले.
श्रीमती रेवती आणि गाडीतील इतर प्रवाशांनी मध्य रेल्वेच्या टीमबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि त्यांच्या कार्याचे मनापासून कौतुक केले.
मध्य रेल्वे श्री. शंभू कुमार यांनी दिलेला तत्पर प्रतिसाद व त्वरित निर्णयामुळे आणि योग्य संवादामुळे हरवलेल्या मुलाचा वेळेत शोध घेणे शक्य झाले. प्रवासादरम्यान मुलांची विशेष काळजी घ्यावी आणि मदतीसाठी कर्तव्यावरील टीटीई / ट्रेन कंडक्टरशी संपर्क साधावा किंवा १३९ क्रमांकावर 'रेल मदत' सेवेशी संपर्क साधावा असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केले.
--
إرسال تعليق