खेड: लायन्स क्लब ऑफ खेड सिटी व प्राथमिक आरोग्य केंद्र, जामगे यांच्या संयुक्त विद्यमाने चाकाळे येथे भव्य मोफत आरोग्य तपासणी, औषधोपचार व जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून एकूण २१८ रुग्णांची तपासणी करण्यात आली.
शिबिरामध्ये शाळेतील विद्यार्थी, अंगणवाडीतील बालके, महिला बचत गटांच्या सदस्य, युवक मंडळ तसेच परिसरातील नागरिकांची मोफत वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर आवश्यक औषधांचे मोफत वितरणही करण्यात आले. यावेळी डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया, टायफॉईड यांसारख्या साथीच्या आजारांपासून बचावासाठी घ्यावयाची काळजी, स्वच्छतेचे महत्त्व, उच्च रक्तदाब, रक्तातील साखरेचे प्रमाण, कर्करोग प्रतिबंध आणि आरोग्यदायी जीवनशैली याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
या शिबिरात डॉ. आदित्य चिंदे, कळंबणीच्या उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. दालीमकर आणि डॉ. नम्रता भुवड यांनी रुग्णांची तपासणी करून आवश्यक वैद्यकीय सल्ला व उपचार दिले.
महावीर एजन्सीचे अक्षत जैन यांच्या सहकार्याने तसेच लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचे माजी अध्यक्ष शंकर चंद्रकांत पार्टे यांच्या पुढाकारातून गरजू लाभार्थ्यांना प्रोटीन डब्यांचे वाटप करण्यात आले. तसेच लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष रोहन विचारे यांच्या हस्ते शालेय विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले, तर लायन्स क्लब ऑफ खेड सिटीतर्फे विद्यार्थ्यांना खाऊचे वितरणही करण्यात आले.
कार्यक्रमाला लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचे अध्यक्ष अविनाश दळवी, माजी अध्यक्ष शंकर चंद्रकांत पार्टे, रोहन विचारे, चिकणे, पोलीस पाटील विकास वाडकर, ग्रामस्थ नाना वाडकर, उदय पाष्टे, महिला मंडळाच्या पायल भिलारे, मुख्याध्यापक विजयकुमार भुवड, संध्या निकम, पदवीधर शिक्षक धर्मपाल तांबे, प्राथमिक आरोग्य केंद्र जामगेच्या सीएचओ शुभांगी वासवाणी, आरोग्य सेविका शुभांगी हरावडे, आशा सेविका प्राची कदम, अंगणवाडी सेविका सौ. कदम , ग्रामपंचायत पदाधिकारी, महिला बचत गटाच्या सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामीण भागातील नागरिकांना मोफत आरोग्यसेवा उपलब्ध करून देणारा हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरला असून लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या सामाजिक बांधिलकीच्या कार्याचे ग्रामस्थांनी कौतुक करत आयोजकांना शुभेच्छा दिल्या.
--
Post a Comment