खेड बसस्थानक परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य; प्रवासी व कर्मचाऱ्यांचे हाल



खेड: येथील बसस्थानक परिसरात अस्वच्छता आणि दुर्गंधीचा प्रश्न गंभीर बनला असून प्रवासी तसेच राज्य परिवहन कर्मचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. चालक-वाहक यांची नियतने वाटप करण्यासाठी उभारण्यात आलेल्या कक्षांसमोर दुर्गंधीयुक्त सांडपाणी साचत असल्याने परिसरात अस्वच्छ वातावरण निर्माण झाले आहे. दरदिवशी सकाळपासून रात्री उशीरापर्यंत या बस स्थानक परिसरात शेकडो प्रवासी, कर्मचारी, विद्यार्थी तसेच ज्येष्ठ नागरिकांची वर्दळ असते. मात्र साचलेल्या सांडपाण्यामुळे तीव्र दुर्गंधी पसरत असून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेषतः वृद्ध नागरिक व लहान मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
याशिवाय संबंधित कार्यालयाच्या भिंतीवर ‘नो पार्किंग’चे फलक लावण्यात आले असतानाही काही वाहनधारकांकडून बेशिस्तपणे दुचाकी वाहने उभी केली जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे परिसरातील वाहतूक विस्कळीत होत असून बस चालक व प्रवाशांना ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
खेड बसस्थानकाच्या दोन्ही प्रवेशद्वारांवर सकाळपासून संध्याकाळपर्यंत मासळी बाजार भरत असल्याने अस्वच्छतेत आणखी भर पडत आहे. मासळी विक्रीमुळे निर्माण होणारा कचरा व दुर्गंधी यामुळे परिसरातील परिस्थिती अधिकच बिकट होत असल्याची प्रवाशांची तक्रार आहे.
दरम्यान, राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यापूर्वी एसटी बसस्थानक व आगारांमधील अस्वच्छतेचा विषय गांभीर्याने घेत काही ठिकाणी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली होती. त्यामुळे खेड बसस्थानक परिसरातील अस्वच्छतेबाबतही स्थानिक प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणी प्रवासी व स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
--

Post a Comment

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...