कर्जत : डॉ.बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठाचा ५४ वा वर्धापन दिन येथील प्रादेशिक कृषी संशोधन केंद्रात सहयोगी संशोधन संचालक डॉ.बी. डी. वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सोत्साह साजरा करण्यात आला.
विद्यापीठ वर्धापन दिनानिमित्त क्रिकेट, व्हॉलीबॉल, बुद्धिबळ, कॅरम, पुरुष व महिला संगीत खुर्ची, अंताक्षरी व रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.सदर स्पर्धांमध्ये शास्त्रज्ञ, अधिकारी,कर्मचारी, मजूर व कंत्राटी कामगारांनीसुद्धा हिरीरीने सहभाग नोंदवला.
बक्षीस वितरण समारंभाचे अध्यक्ष डॉ. बी.डी.वाघमोडे हे होते तर व्यासपीठावर प्रमुख कृषिविद्यावेत्ता डॉ. विजय सागवेकर उपस्थित होते. अध्यक्षीय मार्गदर्शन करताना डॉ वाघमोडे यांनी प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राला मंजूर झालेल्या विविध प्रकल्पांचा उहापोह करीत विद्यापीठाच्या उत्कर्षासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचे प्रतिपादन केले.क्रीडास्पर्धांमध्ये हारजित होत असते पण त्यात सहभाग नोंदवणे महत्त्वाचे असते असे सांगून विविध स्पर्धांमध्ये यश संपादन केलेल्या स्पर्धकांचे त्यांनी अभिनंदन केले.
यानिमित्ताने मागील वर्षी उत्कृष्ट काम करणाऱ्या कनिष्ठ भात पैदासकार डॉ. एम. पी. गवाई, कनिष्ठ कृषिविद्यावेत्ता डॉ. एन. व्ही. म्हसकर, कृषी पर्यवेक्षक माहेशकुमार घारपुरे,वरिष्ठ संशोधन छात्र अनिरुद्ध मदने, कार्यालय अधीक्षक एन. एल.निरडे यांना डॉ. वाघमोडे यांच्या हस्ते शाल, गुलाबपुष्प व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले तसेच विविध क्रीडा स्पर्धांमध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक मिळवलेल्या स्पर्धकांना गुलाबपुष्प, भेटवस्तू व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी डॉ. एन. व्ही. म्हसकर, महेश घारपुरे, अनिरुद्ध मदने, डॉ. एम. पी. गवई यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाच्या सुरुवातीला कै.बाळासाहेब सावंत यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.राष्ट्रगीत, महाराष्ट्रगीत व विद्यापीठ गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कृषी विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ डॉ.रवींद्र मर्दाने यांनी केले.सकाळच्या सत्रात डॉ. वाघमोडे यांच्या हस्ते विद्यापीठाचा ध्वज फडकविण्यात आला.सर्वच उपक्रम आणि स्पर्धा जोशपूर्ण खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाल्याने प्रत्येकाच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहणारा हा आनंदाचा दिवस अविस्मरणीय ठरला.
__
إرسال تعليق