कर्जतचे प्रादेशिक कृषी केंद्र विद्यापीठातील उत्कृष्ट संशोधन केंद्राचे मानकरी!


कर्जत : डॉ बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठातर्फे प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राची उत्कृष्ट संशोधन केंद्र पुरस्कारासाठी निवड झाल्याने दापोलीच्या विश्वेश्वरय्या सभागृहात आयोजित विद्यापीठ वर्धापन दिन सोहळ्यात कुलगुरू डॉ. संजय भावे यांच्या हस्ते या  केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. बी. डी. वाघमोडे यांनी पुरस्कार  स्वीकारला .
       प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र, कर्जत हे दिनांक १४ ऑगस्ट १९१९ रोजी स्थापन झालेले ऐतिहासिक केंद्र आहे.या केंद्राने आतापर्यंत भाताच्या १६ सुधारित व ४ संकरित जाती विकसित केल्या आहेत. दरवर्षी ५०० क्विंटलपेक्षा जास्त मूलभूत, पायाभूत, पैदासकार, सत्यतादर्शक बियाणे तयार करून संबंधित बीजोत्पादन संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या, अन्य संशोधन केंद्रे व शेतकऱ्यांना पुरविले जाते. या केंद्रात भातावरील संशोधन व विस्तार कार्य ही राज्य शासनाची कायमस्वरूपी योजना कार्यरत असून कोंकण व राज्याच्या अन्य विभागासाठी येथून समन्वयाने काम चालते.तसेच अखिल भारतीय समन्वित भात सुधार प्रकल्प व एकात्मिक शेती पद्धती ह्या भारतीय कृषी संशोधन संस्था,नवी दिल्लीच्या योजना येथे सुरू आहेत. त्याद्वारे कृषी विकासाचे मॉडेल तयार केले जातात. विविध पीक लागवड, पशू संवर्धन व दुग्ध विकास, उद्यानविद्या अशा बाबींचा यात समावेश आहे.
      या संशोधन केंद्राने पारंपरिक संशोधनाची दिशा बदलवून वातावरणपूरक व शेतकऱ्यांच्या गरजेनुरूप संशोधन, बीजोत्पादन व विस्तार कार्याच्या पध्दतीमध्ये आमूलाग्र बदल केला आहे.भात संशोधनामध्ये स्पीड ब्रीडिंग, डिजिटल ब्रीडिंग, जैवतंत्रज्ञान या विविध अद्यावत तंत्रज्ञानाचा उपयोग करून जलद पद्धतीने वेगवेगळ्या गुणधर्मासाठी फक्त ६ ते ७ वर्षाच्या कालावधीमध्ये नवीन भात जाती विकसित करून शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याचे तंत्र विकसित केले आहे.यामध्ये पोहा, मुरमुरे सारख्या उद्योगासाठी आवश्यक वैशिष्ट्यपूर्ण जाती, पौष्टिक गुणधर्म असणाऱ्या जाती, सुगंधित जाती, रोगकिडींना प्रतिकारक, कमी पावसात तग धरणाऱ्या, नैसर्गिक शेतीला योग्य ,कमी निविष्ठा, कमी मनुष्यबळ लागणारे पेरभातसारखे भात लागवड तंत्रज्ञान विकसित करण्यात येत आहे. ' स्टे ग्रीन ' वाण व संकरित जाती, ज्याचे उत्पादन १० टन प्रती हेक्टरपेक्षा जास्त असेल, असे संशोधन हाती घेतले आहे.केंद्रावर तसेच विद्यापीठ स्तरावर विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचा प्रचार आणि प्रसार मुद्रित व इलेक्ट्रॉनिक माध्यम, फेसबुक, व्हाट्सएप,इन्स्टाग्रामद्वारे तसेच विविध एप्स व रिल्स बनवून करण्यात येत आहे.
       अद्यावत प्रयोगशाळा, आण्विक प्रजनन प्रयोगशाळा, जलद पैदाससारखी राज्यातील पहिली सुविधा,११२.४५ कोटींचा प्रस्तावित महाअन्नपूर्णा प्रकल्प, अशा विविध सुविधांची दखल घेत परीक्षक चमूने डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील उत्कृष्ट संशोधन केंद्र म्हणून प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राची निवड केली.परिणामतः उत्तर कोंकण विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे,असे केंद्राचे कृषी विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ डॉ. रवींद्र मर्दाने यांनी सांगितले.

Post a Comment

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...