मुंबईतील मृत्यूच्या घटनेचा परिणाम; कल्याण बाजार समितीमध्ये १२ ट्रक कलिंगड पडून, ग्राहकांची पाठ फिरली



कल्याण : मुंबईत घडलेल्या एका धक्कादायक मृत्यूच्या घटनेनंतर कलिंगड विक्रीवर मोठा परिणाम झाला असून कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती (APMC) मध्ये तब्बल १० ते १२ ट्रक कलिंगडाचा माल विक्रीअभावी पडून आहे. ग्राहकांनी अचानक कलिंगड खरेदीकडे पाठ फिरवल्याने शेतकरी आणि विक्रेते हवालदिल झाले आहेत.

उन्हाळ्याच्या दिवसांत कलिंगडाला मोठी मागणी असते. मात्र गेल्या काही दिवसांत बाजारातील चित्र पूर्णपणे बदलले आहे. ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने कलिंगड खरेदीत मोठी घट झाली आहे. परिणामी लाखो रुपयांचा माल ट्रकमध्येच पडून राहिला असून अनेक ठिकाणी कलिंगड खराब होऊ लागले आहे.
मुंबईत एका कुटुंबाने बिर्याणी खाल्ल्यानंतर कलिंगड खाल्ले आणि त्यानंतर चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. या घटनेनंतर नागरिकांमध्ये संभ्रम आणि भीती निर्माण झाली. मात्र अन्न व औषध प्रशासनाने या मृत्यूचा कलिंगडाशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे.

तरीदेखील नागरिकांच्या मनातील भीती कायम असल्याने त्याचा थेट फटका शेतकरी, व्यापारी आणि ट्रक चालकांना बसत आहे. अहिल्यानगर, बीड, नाशिक आदी भागांतून कलिंगड घेऊन आलेल्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. विक्री होत नसल्याने उत्पादन खर्च आणि वाहतूक खर्चही निघत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

वाहतूकदारांनाही याचा फटका बसला असून वाहनांचे हप्ते, इंधन खर्च आणि मजुरी कशी भागवायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

वैद्यकीय तज्ज्ञांनी नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता स्वच्छ आणि ताज्या फळांचे सेवन करावे, असे आवाहन केले आहे. मात्र बाजारातील भीतीचे वातावरण कमी होईपर्यंत शेतकरी आणि विक्रेत्यांची चिंता कायम राहणार असल्याचे चित्र आहे.
--

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...