दापोली मतदारसंघात आंबडवे गाव म्हणजे भाग्याची बाब : ना. योगेश कदम



राज्यमंत्र्यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.

मंडणगड : राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त त्यांचे जन्मस्थळ असलेल्या आंबडवे (ता. मंडणगड, जि. रत्नागिरी) येथे अभिवादनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी राज्यमंत्री योगेश कदम यांनी बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहिली.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना राज्यमंत्री योगेश कदम म्हणाले की, “माझ्या मतदारसंघात आंबडवे गाव असणे ही माझ्यासाठी भाग्याची बाब आहे. हे गाव माझ्यासाठी ऊर्जेचे स्रोत आहे. राज्यातील कामकाजाच्या धावपळीत जेव्हा जेव्हा मी येथे येतो, तेव्हा मला नवचैतन्य मिळते,” असे सांगत गावाशी असलेले आपुलकीचे नाते अधोरेखित केले.
या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्याचा मानस व्यक्त करण्यात आला असून त्यासाठी ग्रामस्थांशी चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. पुनर्वसनासंदर्भातील मागण्या योग्य पद्धतीने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू असून निधीची कोणतीही कमतरता भासणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच भूसंपादन प्रक्रियेसाठी इतर ठिकाणांपेक्षा वेगळे निकष लागू करण्याबाबत मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा झाल्याचे नमूद केले.
समाज एकजुटीवर भर देताना जात-पात न पाहता सर्व समाजघटकांनी एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले. बाबासाहेबांचे विचार आत्मसात करून संघटित होणे आणि लोकशाही अधिक बळकट करणे ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
या कार्यक्रमाला जि.प. रत्नागिरी अध्यक्षा अस्मिता केंद्रे, जि.प. सदस्य व तालुका प्रमुख प्रताप घोसाळकर, सभापती प्रणाली चिले, उपसभापती दिपक मालुसरे, पंचायत समिती सदस्य अनिल रटाटे, पंचायत समिती सदस्या दिप्ती घडशी, तालुका समन्वयक जितेंद्र दवंडे, सचिव सिद्देश देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते.
--

Post a Comment

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...