खेड: माजी मुख्यमंत्री व रत्नागिरीचे खासदार नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवस वर्षानिमित्त घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय
कबड्डी स्पर्धेत भरणेच्या अनिकेत स्पोर्ट क्लब संघाने सिंधूरत्नभूषण चषकावर आपले नाव कोरले.
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने व सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनच्या सहकार्याने वेंगुर्ला येथे १३ एप्रिल रोजी सिंधूरत्नभूषण चषक कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचे आयोजन वेंगुर्ला येथील जय मानसीश्वर कबड्डी संघाने केले होते. या स्पर्धेमध्ये एकूण सोळा संघानी सहभाग घेतला. यामध्ये भरणेच्या अनिकेत स्पोर्ट क्लब संघ सहभाग घेतला होता. उपांत्य फेरीमध्ये स्वराज्य स्पोर्ट क्लब, चिपळूण या बलाढ्य संघावर मात करून अंतिम फेरीमध्ये अनिकेत स्पोर्ट क्लब दाखल झाला . अंतिम सामना एस .एम .स्पोर्ट्स क्लब, कुडाळ या संघामध्ये अटीतटीची लढत झाली व अंतिम ३० विरुद्ध २५ या गुण फरकाने या सामन्यात अनिकेत स्पोर्ट क्लबने वर्चस्व राखले. उत्कृष्ट पकडीचा मान समरीन बुरोंडकर हिला गौरवण्यात आले. तसेच स्पर्धेतील अष्टपैलू खेळाडू म्हणून सिद्धी चाळके हिचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या संघामध्ये राष्ट्रीय खेळाडू तस्मिन बुरोंडकर, सायली शिंदे, सलोनी महाडिक, वंशिका कंचावडे, वैशाली जाधव, समीक्षा शिंदे, जानवी शिंदे, श्रावणी जाधव व मनीषा राठोड या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळ केला.
दरम्यान रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष व खेड नगरपरिषदचे उपनगराध्यक्ष सतीश चिकणे, कार्याध्यक्ष महेश भोसले यांनी संघाचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या संघाला तेजा बैकर, सुभाष आंबेडे, दाजी राजगुरू, विलास बेंद्रे व सुजित फागे यांचे मार्गदर्शन लाभले.
--
Post a Comment