किल्ले रसाळगडच्या तटबंदीचे दगड निखळले

खेड: तालुक्याच्या ऐतिहासिक वैभवाची साक्ष देणारा राज्य संरक्षित किल्ले रसाळगड सध्या दुरवस्थेच्या विळख्यात सापडला आहे. किल्ल्याच्या संवर्धनासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून दुरुस्तीची कामे करण्यात आली असली तरी तटबंदीतील दगड निखळू लागल्याने कामाच्या दर्जावरच गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे ‘कोट्यवधींचा खर्च नेमका कुठे गेला?’, असा संतप्त सवाल दुर्गप्रेमींकडून उपस्थित केला जात आहे.
रसाळगड हा कोकणातील महत्त्वाचा ऐतिहासिक किल्ला असून दरवर्षी मोठ्या संख्येने दुर्गप्रेमी व पर्यटक येथे भेट देतात. किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता त्याचे संवर्धन शास्त्रोक्त आणि दर्जेदार पद्धतीने होणे अपेक्षित आहे. मात्र, दुरुस्तीची कामे झाल्यानंतरही तटबंदीतील दगड सैल होऊन निखळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. किल्ल्याच्या संवर्धनासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या निधीतून झालेल्या कामाची गुणवत्ता तपासण्यात आली का? काम पूर्ण झाल्यानंतर पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली का? ठेकेदाराने वापरलेल्या साहित्याची आणि बांधकाम पद्धतीची तपासणी झाली का? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. महाराज प्रतिष्ठानचे सचिव तथा दुर्गसेवक प्रणव मापुसकर यांनी रसाळगडाच्या या परिस्थितीबाबत तीव्र चिंता व्यक्त केली आहे. ऐतिहासिक वास्तूच्या संवर्धनाच्या नावाखाली निकृष्ट काम होत असेल, तर हा इतिहासाशी केलेला अन्याय असल्याचे दुर्गप्रेमींचे म्हणणे आहे. यापूर्वी झालेल्या कामाचा दर्जा तपासून दोष आढळल्यास कठोर कारवाई करावी अशी मागणी दुर्गप्रेमीनी केली आहे. 
--

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...