मुंबई, दि. २४ : यकृत प्रत्यारोपण, कर्करोगावरील उपचार आणि मेंदूवरील शस्त्रक्रिया यांसारख्या महागड्या उपचारांसाठी आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या राज्यातील गरजू रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि टाटा ट्रस्ट यांच्यातील सामंजस्य करारामुळे मोठा दिलासा मिळत आहे. या करारानंतर अवघ्या सहा महिन्यांत ९ रुग्णांना ८९ लाख ६० हजार ३०१ रुपयांचे आर्थिक सहाय्य मंजूर करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री सहाय्यता निधी, धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष आणि टाटा ट्रस्ट यांच्यात १२ फेब्रुवारी २०२६ रोजी सामंजस्य करार करण्यात आला. या पहिल्याच कराराअंतर्गत राज्यातील १५० गरजू रुग्णांना दुर्धर आणि गंभीर आजारांवरील उपचारांसाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
या उपक्रमातून आतापर्यंत यकृत प्रत्यारोपण, कर्करोग उपचार तसेच मेंदूवरील शस्त्रक्रिया अशा खर्चिक उपचारांसाठी रुग्णांना मदत मिळाली आहे. त्यामुळे आर्थिक परिस्थितीमुळे उपचार घेणे कठीण झालेल्या रुग्णांना वेळेत वैद्यकीय उपचार मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे.
इतर संस्थांसोबतही कराराची प्रक्रिया
टाटा ट्रस्टप्रमाणेच इतर अनेक नामांकित संस्थांसोबतही सामंजस्य करार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. हे करार पूर्ण झाल्यानंतर राज्यातील अधिकाधिक गरजू रुग्णांना गंभीर आजारांवरील उपचारांसाठी आर्थिक मदत उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
शासन, सामाजिक संस्था आणि आरोग्य क्षेत्रातील संस्थांमध्ये समन्वय वाढवून आर्थिक अडचणींमुळे कोणताही रुग्ण उपचारांपासून वंचित राहू नये, यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षामार्फत प्रयत्न सुरू आहेत.
पैशांअभावी उपचार थांबू नयेत : रामेश्वर नाईक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली टाटा ट्रस्टसोबत हा सामंजस्य करार करण्यात आला. याच धर्तीवर इतर नामांकित संस्थांसोबतही करार करण्याची प्रक्रिया सुरू असून, त्यातून अधिकाधिक गरजू रुग्णांना उपचारासाठी आर्थिक मदत मिळणार आहे. पैशांअभावी कोणत्याही रुग्णाचा उपचार थांबू नये, या उद्देशाने मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष सातत्याने कार्यरत असल्याचे कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी सांगितले.
गरजू रुग्णांनी अधिक माहितीसाठी १८०० १२३ २२११ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
--
إرسال تعليق