खेड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर कशेडी बोगद्यात पावसाळ्यात छत तसेच भिंतींमधून मोठ्या प्रमाणात पाणी झिरपत असल्याने वाहनचालकांची चिंता वाढली आहे. बोगद्यातील गळती रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या असल्या तरी पावसाळ्यात समस्या कायम असल्याचे चित्र आहे.
कशेडी घाटातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि प्रवास अधिक सुरक्षित व जलद करण्यासाठी बोगद्याची उभारणी करण्यात आली. मात्र मुसळधार पावसात बोगद्याच्या छतावरील तसेच भिंतींमधून पाणी झिरपून रस्त्यावर साचत असल्याने वाहतुकीवर परिणाम होत आहे. काही ठिकाणी पाण्याचे फवारे रस्त्यावर पडत असल्याने दुचाकीस्वारांसाठी विशेष धोका निर्माण होतो.
गळती रोखण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि संबंधित कंत्राटदारांकडून ग्राऊटिंग, ड्रेनेज व्यवस्था, वॉटरप्रूफिंग, पोकळी सील करणे तसेच फायबर शिटिंग अशा विविध तांत्रिक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मात्र मुसळधार पावसात या उपाययोजनांचा अपेक्षित परिणाम होत नसल्याचे दिसून येत आहे.
कशेडी बोगदा आणि जोडरस्त्यांच्या प्रकल्पासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. बोगद्याची लांबी सुमारे दोन किलोमीटर असून, दोन्ही समांतर बोगद्यांमुळे मुंबई-गोवा महामार्गावरील प्रवास अधिक सुलभ होण्याची अपेक्षा होती. मात्र पावसाळ्यातील गळतीमुळे बोगद्याच्या बांधकामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
बोगद्याच्या छतावरून व भिंतींमधून पाणी रस्त्यावर पडत असल्याने रस्ता निसरडा होतो. त्यामुळे विशेषतः दुचाकीस्वारांना अपघाताचा धोका वाढला आहे. प्रशासनाने गळतीची कायमस्वरूपी समस्या दूर करून वाहनचालकांना सुरक्षित प्रवासाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होत आहे.
कोट्यवधींच्या खर्चानंतरही पावसाळ्यात बोगद्यात पाणी झिरपत असल्याने या समस्येवर तातडीने कायमस्वरूपी तांत्रिक उपाय करण्याची गरज निर्माण झाली आहे.
--
Post a Comment