मुंबई : महाराष्ट्रातील कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट समोर आली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी आज किंवा उद्या जाहीर होण्याची शक्यता असल्याची माहिती समोर आली आहे. या यादीत सुमारे ६ लाख ३० हजार शेतकरी पात्र लाभार्थी असण्याची शक्यता असून, त्यांच्यासाठी तब्बल ५,०८० कोटी रुपयांचा निधी वितरित केला जाणार असल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने देण्यात आली आहे.
मागील टप्प्यांमध्ये तांत्रिक अडचणी किंवा इतर कारणांमुळे कर्जमाफीचा लाभ मिळू न शकलेल्या शेतकऱ्यांचा यावेळी विचार केला जाणार आहे. विशेषतः केवायसी पूर्ण न झाल्यामुळे लाभापासून वंचित राहिलेल्या जवळपास १ लाख शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.
एकूण ५,०८० कोटींचा लाभ
तिसऱ्या यादीतील सुमारे ६.३० लाख लाभार्थी शेतकऱ्यांसाठी एकूण ५,०८० कोटी रुपये वितरित केले जाणार असल्याची माहिती आहे. यादी प्रसिद्ध झाल्यानंतर पात्र शेतकऱ्यांना आपले नाव तपासता येणार असून, पुढील लाभाची प्रक्रिया सुरू होईल.
हिंगोलीतील स्थिती काय?
हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत ४३ हजार ५२५ शेतकरी योजनेसाठी पात्र ठरले आहेत. त्यापैकी ३३ हजार ९२६ लाभार्थ्यांचे ई-केवायसी पूर्ण झाले आहे.
दरम्यान, राज्य सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेत २ लाख रुपयांपर्यंतच्या पीक कर्जमाफीला मंत्रिमंडळाची मंजुरी दिली आहे.
--
महत्त्वाचे : तिसरी यादी आज (२४ सप्टेंबर) किंवा उद्या प्रसिद्ध होण्याची माहिती सध्या सूत्रांच्या हवाल्याने आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अधिकृत यादी प्रसिद्ध झाल्यानंतरच अंतिम लाभार्थी स्थिती निश्चित करावी.
--
Post a Comment