खेड :आदिवासी सामाजिक सेवा संस्था, रत्नागिरी व आदिम कातकरी संघटना, शाखा खेड यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक आदिवासी दिनानिमित्त रविवारी (९ऑगस्ट) शहरातील पाटीदार भवन येथे विशेष कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमाला वनश्री पुरस्कार प्राप्त ज्योती कदम, माजी आमदार संजय कदम, शशिकांत चव्हाण, गृहराज्यमंत्री ना. योगेश कदम यांच्या पत्नी तथा सामाजिक कार्यकर्त्या श्रेया कदम, प्रांताधिकारी वैशाली पाटील, जि. प. अध्यक्षा अस्मिता केंद्रे, सदस्य सचिन धाडवे, रेवती पाटील, सुप्रिया पवार, सभापती डॉ. अफिया पालोकर, कुंदन सातपुते यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एकात्मिक बालविकास विभागाच्या पर्यवेक्षिका प्रीती पवार यांनी केले. यावेळी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या अधिकारी तेजस्विनी गलांडे यांचीही उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक प्रकल्प अधिकारी गायकवाड यांनी केले.
कार्यक्रमापूर्वी खेड शहरातून आदिवासी कातकरी समाजातील शेकडो महिला, पुरुष, युवक, युवती तसेच विद्यार्थ्यांनी भव्य रॅली काढली. क्रांतिकारक बिरसा मुंडा आणि हुतात्मा नाग्या कातकरी यांच्या नावाचा जयघोष तसेच ढोल-ताशांच्या गजराने संपूर्ण शहराचे वातावरण आदिवासी संस्कृती आणि एकजुटीने भारावून गेले. रॅलीमध्ये पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या महिला, पुरुष आणि विद्यार्थ्यांनी आदिवासी समाजाच्या सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडविले.
आदिवासी समाजाच्या हक्कांबाबत जनजागृती, सामाजिक एकता आणि विकासाचा संदेश या रॅलीच्या माध्यमातून देण्यात आला. जागतिक आदिवासी दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमातून आदिवासी समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक विकासासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
यावेळी महसूल, आरोग्य, पंचायत समिती, आदिवासी प्रकल्प विभाग यांसह शासनाच्या विविध विभागांच्या योजनांचा लाभ आदिवासी बांधवांना मिळवून देण्यासाठी विशेष कक्ष उभारण्यात आले होते.
--
إرسال تعليق