दहिवली दरड दुर्घटनेनंतर मानवतेचा हात; बाधित कुटुंबांना शिधा वाटप

खेड :तालुक्यातील दहिवली येथील शेलारवाडी परिसरात मुसळधार पावसामुळे झालेल्या दरड दुर्घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून एक वृद्ध महिला गंभीर जखमी आहे. तसेच संभाव्य धोका लक्षात घेऊन शेलारवाडीतील १६ कुटुंबांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले आहे.
या आपत्तीग्रस्त कुटुंबांच्या मदतीसाठी अनेक सामाजिक संस्था आणि नागरिक पुढे येत आहेत. त्याच अनुषंगाने वेरळ येथील श्री समर्थ कृपा विश्व प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुयश पाष्टे यांच्या वतीने दुर्घटनेत मृत्यू झालेल्या शेलार कुटुंबासह अन्य आठ आपत्तीग्रस्त कुटुंबांना जीवनावश्यक शिधा साहित्याचे वाटप करण्यात आले. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या कल्पना शेलार यांच्या तब्येतीची चौकशी करून श्री पाष्टे यांनी सांत्वन केले.
यावेळी कोकणरत्न पतसंस्थेचे अध्यक्ष उमेश नक्षे, संस्थेचे संचालक तसेच व्यावसायिक श्रीकांत कदम उपस्थित होते. संकटाच्या काळात सामाजिक बांधिलकी जपत गरजू कुटुंबांना तातडीची मदत करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असल्याचे मत सुयश पाष्टे यांनी व्यक्त केले. 
"ही मदत आपल्या दुःखाची भरपाई करू शकत नाही, मात्र या कठीण काळात थोडासा आधार मिळावा, या भावनेतून आम्ही ही मदत करत आहोत. आपण धीर सोडू नका, आम्ही आपल्या कुटुंबासोबत असल्याचे कोकण रत्न पतसंस्थेचे अध्यक्ष उमेश नक्षे यांनी सांगितले.

दरड दुर्घटनेनंतर स्थानिक प्रशासन, स्वयंसेवी संस्था आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून मदतकार्य सुरू असून बाधित कुटुंबांना आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यावेळी तळेच्या मंडळ अधिकारी अर्चना लाकडे, ग्राम महसूल अधिकारी रोहन पाटेकर, ग्राम विकास अधिकारी गजानन घुगे, सुप्रिया पवार, पोलिस पाटील संतोष कदम, सुखदेव पवार, ना. बा. शेलार, रामचंद्र आखाडे व पत्रकार हर्षल शिरोडकर आदी उपस्थित होते.
--

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...