खेड: येथील नगरपरिषद हद्दीतील गुलमोहर पार्क खेळाचे मैदान ते कचरा डेपो दरम्यानच्या रस्त्याच्या विकासकामाचे भूमिपूजन गृहराज्यमंत्री ना. योगेश कदम यांच्या हस्ते पार पडले.
सुमारे ४ कोटी ३२ लाख ६५ हजार रुपये अंदाजपत्रीय रकमेच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे शहराच्या विकासाला नवी दिशा मिळणार आहे. या कार्यक्रमाला खेडच्या नगराध्यक्ष माधवी बुटाला, शहरप्रमुख कुंदन सातपुते, जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण
यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना गृहराज्यमंत्री ना.योगेश कदम यांनी सांगितले की, या रस्त्याच्या विकासामुळे शहरवासीयांना भेडसावणारी वाहतूक समस्या मोठ्या प्रमाणात दूर होणार आहे. विशेषतः वाय जंक्शनमुळे खेड शहराचा खाडीपट्टा विभागाशी थेट संपर्क प्रस्थापित होणार असून वाहतूक सुलभ होईल. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी दिलेली आश्वासने पूर्ण करण्याचा सरकारचा प्रयत्न असून, आगामी काळात खेड शहराच्या पायाभूत सुविधांमध्ये आणखी सुधारणा करण्यावर भर दिला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, या वाय जंक्शनमुळे शहराबाहेरील परिसरातील जागांचे दर वाढल्याची माहिती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महादेव रोडगे यांनी यावेळी दिली.
--
Post a Comment