कर्जत : दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ आणि आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्था, फिलिपाईन्स यांच्यात झालेल्या आंतरराष्ट्रीय सामंजस्य करारामुळे भात शेतीचा कायापालट करणारा आणि राज्यस्तरीय भात विकासवाढीचा ११२ कोटी रुपयांचा ऐतिहासिक ' महाअन्नपूर्णा प्रकल्प १.० ' केंद्र व राज्य शासनाच्या निधीतून मंजूर झाल्याने दापोली कृषी विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पुढाकाराने हा प्रकल्प तयार करण्यात आला होता. या प्रकल्पाच्या मंजुरीसाठी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी, कृषी विभागाचे सचिव परिमल सिंग, कृषी प्रक्रिया व नियोजनचे संचालक विनयकुमार आवटे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या प्रकल्पाचे प्रमुख अन्वेषक म्हणून कर्जतच्या प्रादेशिक कृषी संशोधन केंद्रातील विशेषज्ञ व सहयोगी संशोधन संचालक डॉ. बी. डी. वाघमोडे हे आहेत.
राज्यातील भात उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पादन व उत्पन्न वाढीसाठी आणि वातावरणपूरक भात जाती तसेच तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत सदर प्रकल्प महाराष्ट्र शासनामार्फत केंद्र शासनास सादर करण्यात आला होता. हा प्रकल्प ५ वर्षांसाठी असून त्यात ६० टक्के केंद्र व ४० टक्के महाराष्ट्र शासनाचा वाटा असणार आहे.
हा प्रकल्प राज्यातील चारही कृषी विद्यापीठाच्या १४ संशोधन केंद्रांवर तसेच भात पिकवणाऱ्या सर्व विभागातील शेतकऱ्यांच्या शेतावर राबविण्यात येणार आहे. याद्वारे शास्त्रज्ञ, विद्यार्थी, शेतकरी व राज्यातील संबंधित संस्था यांना आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्था फिलिपाईन्स यांच्याकडून उच्च दर्जाचे प्रशिक्षण, जागतिक दर्जाचे शास्त्रज्ञ, भात पिकाचे विविध जर्मप्लाझम इ.बाबतीत महत्त्वपूर्ण सहकार्य मिळणार आहे.
राज्यातील भातशेती पावसावर निर्भर असल्याने वारंवार हवामान बदलामुळे पाऊस उशिरा येणे, खंड पडणे, कमी कालावधीत जास्त पाऊस पडणे, तसेच पीक पक्वतेवेळी जास्त पाऊस पडल्याने भात पीक लोळून नुकसान होणे, किडी रोगाचा मोठया प्रमाणावर उद्रेक होणे, भात पुनर्लागवड, कापणी, मळणी इ.कामासाठी मनुष्यबळ वेळेत न मिळणे, यामुळे राज्यातील भात उत्पादनावर मोठा परिणाम होत आहे. कमी उत्पादकतेच्या कारणांमध्ये प्रामुख्याने वेगवेगळी कृषी आधारित परिसंस्था, वरकस, मध्य उंचीच्या आणि पाणथळ जमिनी यांची आव्हाने आहेत. यामध्ये वेळेत भात पुन:र्लागवडीसाठी मनुष्यबळ मिळत नसल्याने भात शेतीपडमध्ये वाढ होत आहे. तसेच भात पिकवणाऱ्या भागात पौष्टिकमुल्य योग्य प्रमाणात नसल्याने कुपोषणात वाढ होत आहे. कमी ओलावा, क्षारता, पूरसदृश्य परिस्थितीमध्ये भात पीक बुडून राहणे कमी सूर्यप्रकाश यासारखी विविध आव्हाने समर्थपणे पेलण्यासाठी महाअन्नपूर्णा १.० हा राज्यस्तरीय प्रकल्प तयार करण्यात आला आहे.
या प्रकल्पाचे डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ मुख्य समन्वयक आणि आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्था, फिलिपाईन्स हे धोरणात्मक सहकारी म्हणून काम करतील. राज्यातील कृषी विद्यापीठांच्या समन्वयाने आणि त्यांच्या कार्यपद्धतीच्या चौकटीमध्ये राहून राज्यातील भात पिकाचे मूल्य साखळीमध्ये आधुनिकीकरण, प्रगत आणि कार्यक्षम शास्त्रीय संसाधने, भौगोलिक मूल्यमापन, जनुकीय निवड, जलद पैदास करण्यासाठीची कार्यपद्धती, अचूक निरीक्षण नोंदण्याची पध्दती यांचा मेळ घालून अधिक उत्पादन देणाऱ्या पेर भातास अनुकूल व बदलत्या वातावरणात तग धरू शकणाऱ्या आणि ग्राहकांच्या गरजेनुरूप भात वाणांची निर्मिती करता येणार आहे. यामुळे पारदर्शक, सक्षम अशी बाजारपेठेशी संलग्न बियाणे वितरण प्रक्रिया निर्माण करता येईल. मूल्यवर्धित साखळीमध्ये शास्त्रज्ञ, विद्यार्थी, शेतकरी यांची क्षमता वाढविणे व त्यांचा सहभाग वृद्धिंगत करणेही शक्य होणार आहे अशी माहिती कृषी विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ डॉ. रवींद्र मर्दाने यांनी दिली.
--
Post a Comment