खेड:तालुक्यातील लोटे औद्योगिक परिसरात एका कंपनीतून सुमारे २ लाख ५४ हजार १५० रुपयांच्या लोखंडी वजन मापांची चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी खेड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून एका ट्रक चालकावर संशय व्यक्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना २५ ते २ एप्रिल २०२६ या कालावधीत घडली आहे. ही घटना २ एप्रिल रोजी सकाळी साडेनऊ वाजता ही बाब निदर्शनास आली. याप्रकरणी अमोल आनंद अकुलकर (वय४५ रा. चिपळूण) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी संशयित आरोपी संजय सितापराव याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादीच्या तक्रारीनुसार,दोन वेगवेगळ्या कंपन्यांकडून खरेदी करुन संबंधित कंपनीच्या स्टोअर परिसरात ठेवण्यात आलेल्या लोखंडी वजन मापांपैकी काही मापे चोरीस गेल्याचे निदर्शनास आले.
त्यामध्ये एका कंपनीकडून खरेदी करण्यात आलेल्या मापांपैकी सुमारे १ लाख ८७ हजार ५०० रुपयांची मापे आणि दुसऱ्या कंपनीची ६७ हजार ४५० रुपयांची मापे अशी एकूण सुमारे २ लाख ५४ हजार १५० रुपयांच्या लोखंडी वजन मापांची चोरी झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.
सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर २ एप्रिल रोजी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास एमएच ०६ बीएल ३०८१ क्रमांकाचा ट्रक कंपनी परिसरात आल्याचे दिसून आले. ट्रक चालकाने वाहनातून उतरून सुमारे १० मिनिटे परिसरात थांबत टेम्पोच्या बाजूचे दरवाजे उघडून हालचाली केल्याचे फुटेजमध्ये आढळले आहे.
यावरून संबंधित ट्रक चालकानेच वजन माप चोरी केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणी भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.
--
إرسال تعليق