खेड : मुंबई-गोवा जुन्या महामार्गावरील कशेडी घाटात खेड आगाराच्या खेड-बोरिवली एसटी बसचा भीषण अपघात झाला. बसचे ब्रेक निकामी झाल्याने समोरून जाणाऱ्या बल्कर ट्रकला जोरदार धडक बसली. या अपघातात ट्रक चालकासह बसमधील १२ ते १३ प्रवासी जखमी झाले असून काहींना किरकोळ तर काहींना गंभीर दुखापत झाली आहे.
खेड स्थानकातून रात्री १० वाजता सुटलेली ही बस बोरिवलीच्या दिशेने निघाली होती. रात्री सुमारे ११.३० वाजण्याच्या सुमारास रायगड जिल्ह्यातील भोगाव परिसरात बस कशेडी घाटातून जात असताना अचानक ब्रेक निकामी झाले. चालकाचे नियंत्रण सुटल्याने बसने समोर असलेल्या बल्कर ट्रकला जोरदार धडक दिली.
अपघात झालेल्या ठिकाणी एका बाजूला खोल दरी असून बस थोडक्यात दरीत कोसळण्यापासून बचावली. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. अन्यथा गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलादपूर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. जखमींना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले. या अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.
दरम्यान, भोगाव परिसरात सध्या रस्त्याचे काम सुरू असून सुरक्षिततेच्या उपाययोजनांबाबत स्थानिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमुळे घाटातील रस्ते सुरक्षा, सुरू असलेली कामे आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
--
إرسال تعليق